*हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग ३)*.
वाचक मित्रांनो, बंधुंनो आणि भगिनींनो सस्नेह / सादर नमस्ते. मागील दोन भागात आपण अनुक्रमे हैद्राबाद संस्थानाची भौगोलिक आणि धार्मिक पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीची तत्कालीन प्रशासनावरील पकड, त्यातून हिंदू मधे निर्माण झालेली असुरक्षिततेची चिंता, पुढे दीनदार अंजुमन या इस्लामिक धार्मिक संस्थेची फोफावलेली धर्मांतरण चळवळ, पुढे त्यास प्रतिसाद स्वरूप आव्हान म्हणून जन्मलेली आर्य समाजी चळवळ, पुढे मुस्लिम लीग चा नेता बहादुर यार जंग द्वारे संस्थानात स्थापित झालेली "ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल" या संगठनेची स्थापना आणि त्याच्या द्विराष्ट्राच्या सिद्धांतावर वाढलेल्या कार्यवाया, त्याचे झालेले अकाली निधन आणि त्याची सुत्रे हाती घेत कासिम रिझवी चा पुढे आलेला चेहरा या संबंधित सर्व आढावा अनुक्रमे घेतला. परंतु १८९२ सालीच हैद्राबाद संस्थानत झालेली आर्य समाज ची स्थापना आणि पुढे १९३८ पर्यंत संस्थानात फोफवलेल्या जवळपास २५० पेक्षा अधिक आर्य समाज च्या सक्रिय शाखा दोन्ही इस्लामिक चळवळी म्हणजे "दीनदार अंजुमन आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल" यांच्या समोर मोठे आव्हान बनून उभ्या राहिल्या होत्या. आणि या इस्लामिक चळवळीच्या डोळ्यात सलत होत्या. त्याची परिणीती काय झाली याचा आढावा आपण या भागात घेणार आहोत.
.
*संस्थानातील इस्लामिक चळवळी समोर आर्य समाज चे उभे राहिलेले प्रखर आंदोलन*
साल १९३० चे दशक. हैद्राबाद संस्थानात आर्य समाज ची चळवळ गाव पातळीवर येऊन धडकली होती. गावोगावी "आर्य वीर दल" च्या शाखेतून हिंदू युवक आर्य समाज शी जोडले जात होते. इस्लामिक धर्मांतरण चळवळीस कडवी झुंज देण्याचा निश्चय आर्य समाज च्या नेतृत्वात घेतला जात होता. ही चळवळ आपल्या उद्दिष्टा मधे सर्वात मोठी अडचण आहे हे "दीनदार अंजुमन आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल" या दोन्ही इस्लामिक चळवळीला कळून चुकले होते. ज्या चळवळी मुस्लिम लीग चा संस्थापक जिन्ना याच्या इशाऱ्यावर संस्थानात मोर्चे बांधणी करीत होत्या.
हैद्राबाद संस्थानात या मोर्चेबांधणी विरुद्ध सर्वात पहिला आवाज आर्य समाज चा होता. "दीनदार अंजुमन आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल" या दोन्ही संगठनेचा प्रभाव निजामाच्या प्रशासकीय कामकाजात वाढत चालला होता. अर्थात निजाम चा प्रधान कासिम रिझवी याचे संरक्षण त्यास प्राप्त होते. साल १९३५ साली मिर्जा मुहंमद या कलेक्टर ने निलंगा येथील आर्य समाज मंदिर आणि तेथील हवणकुंड तोडून पायदळी तुडवले. ज्याचे संस्थानात तीव्र पडसाद उमटले. साल १९३७ साली अनेक संतापजनक घटना घडल्या. या काळात गाव तिथे आर्य समाज ची शाखा असे चित्र उभे राहत होते. या काळात संस्थानात सुमारे ४०,००० नागरीक आर्य समाज चे अनुयायी झाले होते. दिनांक २३ फेब्रुवारी १९३७ ला धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे आर्य समाज चे नेते भाई बन्सीलाल यांचे व्याख्यान आयोजित केले गेले होते. गुंजोटी येथील तरुण आर्य समाजी पंडित वेदप्रकाश हे भाई बन्सीलाल यांना आणण्या साठी गावा कडून तालुक्याच्या ठिकाणी उमरगा येथे गेले होते. परंतु काही कारणास्तव भाई बन्सीलाल येऊ शकले नाहीत. निराश होऊन पंडित वेदप्रकाश गावी परतले. त्या दिवशी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल च्या काही गुंडांनी गुंजोटी येथे टोळक्याने प्रवेश केला. आर्य समाज कार्यक्रम उधळून लावण्याचा बेत होता. ही टोळकी घोषणा देत पंडित वेदप्रकाश यांच्या घराच्या दिशेने धावत होती. भाई बन्सीलाल आले असावेत या आशेने पंडित वेदप्रकाश हे घरा बाहेर आले. घरा पासून काही मीटर अंतर कापून आलेच असतील की तेवढ्यात या मजलिस च्या गुंडांनी त्यांना घेरले. मजलिस पासून आपणास धोका आहे हे पंडित वेदप्रकाश जाणून होते. परंतु अत्यंत पिळदार शरीरयष्टी असलेले पंडित वेदप्रकाश हे त्या दिवशी अत्यंत बेसावध, निशस्त्र शत्रूच्या तावडीत गावले. त्यांच्यावर मजलिस च्या गुंडांनी चहूबाजूने तलवारीने हल्ला चढवला. रक्ताच्या थारोळ्यात पंडित वेदप्रकाश यांनी स्वतःचा देह ठेवला. आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पंडित वेदप्रकाश हे पहिले हुतात्मा ठरले. त्यांच्या गाव पासून माझे आजोळ अवघ्या तीन किलोमीटर हाकेच्या अंतरावरच आहे. गावात आजही शासनाने त्यांच्या नावे उभारलेले स्मारक आहे. बघता बघता ही वार्ता वणव्या सारखी संस्थानात सर्वदूर पसरली. आणि आर्य समाजीयांच्या मनात प्रतिशोधाची ज्वाला पेटली. ही ज्वाला शमते न शमते तोवर बस्वकल्याण येथे अशीच घटना घडली. बस्वकल्याण येथील आर्य समाज चे नेते धर्मप्रकाश यांच्यावर ही याच मजलिस ने हल्ला चढवला. आणि धर्मप्रकाश यांना वीर मरण आले. १९३८ साली उदगीर येथे दसऱ्याच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. यात आर्य समाज चे नेते माणिकराव यांच्यावर ही हल्ला झाला. पुढे आर्य समाज चे नेते भाई श्यामलाल यांना अटक करण्यात आली. १६ डिसेंबर १९३८ ला निजामाच्या जेल मधे त्यांच्यावर विषप्रयोग झाला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोकांचा जनसागर उसळला. संस्थानिकांच्या मधे संतापाची लाट उसळली. आर्य समाज च्या या आंदोलनाला पुढे जनआंदोलन चे स्वरूप प्राप्त झाले. जनता ही निडर पने रस्त्यावर उतरली. दिनांक २४ ऑक्टोबर १९३८ ते ७ ऑगस्ट १९३९ या दरम्यान सुमारे १५००० आर्य समाजी हैद्राबाद मुक्ती संग्रामातील लढ्यात जेल मध्ये गेले. या लढ्यात नंतर सामील झालेल्या डाव्या संगठना, हैद्राबाद स्टेट काँग्रेस या पेक्षा कितीतरी पटीने ही संख्या जास्त होती.
याचे परिणाम संस्थानात काय झाले हे पुढील भागात.
.
क्रमशः
©रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.
(लेखक जगदाळे हे हैद्राबाद संस्थानातील १०४ वर्षीय ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी स्वामी श्रद्धानंद सरस्वती (पूज्य हरिश्चंद्र गुरुजी) यांचे नातू आहेत)
Comments
Post a Comment