*हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग २)*.
वाचक मित्रांनो मागील भागात आपण हैद्राबाद संस्थानातील भौगोलिक आणि धार्मिक पार्श्वभूमी याचे अवलोकन व त्याचा प्रशासकीय कामकाजावर असलेला प्रभाव आणि त्या माध्यमातून संस्थांनातील बहुसंख्यक हिंदुंना होणारा आत्मिक दंश याचा अंदाज बांधत होतो. या भागात आपण त्या धार्मिक पार्श्वभुमी मुळे संस्थानात सुरू झालेल्या सामाजिक चळवळीची दिशा वेधनार आहोत.
*दीनदार अंजुमन द्वारे धर्मांतरण चळवळीचा उद्रेक*
काँग्रेस मधील सुधारणावादी चळवळ म्हणजेच आर्य समाजी चळवळ आणि रूढीवादी म्हणजेच टिळकांची चळवळ या दोन्ही चळवळीच्या मुळाशी हिंदूचे हीत सुनिश्चित आहे असा समज झाल्या कारणे साल १९०६ साली देशात मुस्लिम लीग ची स्थापना झाली आणि द्वी राष्ट्राचा सिद्धांत बळावला. देशात ठीक ठिकाणी इस्लामिक चळवळींनी जोर पकडला.
त्याचाच एक भाग म्हणून साल १९२४ साली सिद्दीकी हुसैन याने "दिनदार अंजुमन" या इस्लामिक धार्मिक संस्थेची स्थापना केली. इस्लाम मधील सुफीवादी पंथावर वाटचाल करणारी संस्था म्हणून या संस्थेने इस्लाम-लिंगायत समानतेचा आव आणला खरा परंतु हैद्राबाद संस्थानात या संस्थेवर धर्मांतरणाच्या चळवळीत सक्रिय असल्याचे गंभीर आरोप झाले. प्रामुख्याने बीदर, भालकी, बस्वकल्याण, हुमनाबाद, गुलबर्गा आदी ठिकाणी असलेल्या भोळ्या भाबड्या लिंगायत समाजात या संस्थेची धर्मांतरण चळवळ फोफावली. याचा संस्थापक सिद्दीकी हुसैन याने स्वतःस चन्ना बसवेश्वर यांचा अवतार घोषित केले. आणि आपल्या धर्मांतरण चळवळीला पुढे नेले. परिणाम स्वरूप यास विरोध म्हणून हिंदू सुधार आंदोलन जे १९ व्या शतकात १० एप्रिल १८७५ रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केले होते. त्या आर्य समाज ने या दीनदार अंजुमन च्या धर्मांतरण चळवळीस लढा दिला. आणि येथून खऱ्या अर्थाने संस्थानात धार्मिक संघर्षाला सुरुवात झाली. हुसैन सिद्दीकी याची ही संगठना वर्ष २००७ मधे कायदेशीर रित्या बंद झालेली आहे. साल २००८ मधे सीमापार दहशतवादी कार्यवाया मधे या संगठनेची पाळेमुळे लक्षात आल्यानंतर या संगठनेच्या ११ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तर १२ जणांना जन्मठेप ही झाली. ज्यातील प्रमुख आरोपी जिया-उल-हसन हा याच सिद्दीकी हुसैन याचा मुलगा होता. पुढे हैद्राबाद संस्थानातील मुस्लिम लीग चा नेता बहादुर यार जंग याने हैद्राबाद संस्थानात "ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल" या संगठनेची स्थापना केली. बहादूर यार जंग साल १९३८ साली या संगठनेच्या अध्यक्ष पदी होता. ज्याने शेवटच्या श्वासा पर्यंत या संगठनेच्या माध्यमातून हुसैन सिद्दीकी याच्या अजेंड्यावर ही काम केले. केवळ लिंगायत समाज बांधव नव्हे हिंदुंवर ही याचे प्रयोग केले जात होते.
परंतु या धर्मांतरण चळवळीस आर्य समाज निकराचा लढा देत होता. वर्ष १८९२ सालीच हैद्राबाद शहरात आर्य समाज ची स्थापना झालेली होती. आणि साल १९३८ पर्यंत हैद्राबाद संस्थानात २५० पेक्षा अधिक सक्रिय आर्य समाज च्या शाखा उघडल्या गेल्या होत्या. साहजिक होते हैद्राबाद संस्थान मुस्लिम लीग च्या इशाऱ्यावर इस्लामिक राज्य बनण्यात सर्वात मोठी अडचण संस्थानात फोफावलेली आर्य समाजी चळवळ ठरत होती. ज्या मुळे ती बहादुर यार जंग आणि पुढे बहादुर यार जंग याच्या १९४४ साली झालेल्या अकाली निधनानंतर पुढे कासिम रिजवी याच्या डोळ्यात ही सलत होती. ती कशी हे पुढील भागात पाहू.
.
*क्रमशः*
.
© रोहित जगदाळे पाटील
परभणी, महाराष्ट्र.
(लेखक जगदाळे हे हैद्राबाद संस्थानातील १०४ वर्षीय ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी स्वामी श्रद्धानंद सरस्वती (पूज्य हरिश्चंद्र गुरुजी) यांचे नातू आहेत.)
Comments
Post a Comment