*हैद्राबाद मुक्ती संग्रमाच्या अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग १)*.

          दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारतातील अनेक अशी छोटी मोठी संस्थान होती जी स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हती. ज्यात हैद्राबाद, कश्मिर, जुनागढ, गोवा-दिव-दमण व नगर हवेली, पाँडचेरी, सिक्कीम, मणिपूर तसेच त्रिपुरा अश्या काही भागांचा समावेश आहे. यातील काही संस्थानांच्या सोबत चर्चेने मार्ग निघाला परंतु काही संस्थांनिकांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार दिला. परिणामी हैद्राबाद संस्थाना मधे एक रक्तरंजित क्रांतिकारी इतिहास घडला.जो इतिहास संस्थानातील पुढील पिढीमध्ये येणे आवश्यक आहे. 
         मित्रांनो कोणत्याही इतिहासाच्या पाऊल खूनांचा वेध घेत असताना त्या मागील भौगोलिक,धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमी त्यावर आधारित तिथे अस्तित्वात आलेल्या धार्मिक आणि सामाजिक चळवळी, त्या चळवळींचा तेथील प्रभाव याचे अवलोकन करणे महत्त्वपूर्ण आहे. त्या शिवाय इतिहासाची पाळेमुळे उघडकीस येत नाहीत.
तर पाहूया या मुक्ती संग्रामा मधील महत्त्वपूर्ण अशी पार्श्वभूमी.
.
*भौगोलिक आणि धार्मिक पार्श्वभूमी :*
         स्वातंत्र्यपूर्व काळात हे संस्थान देशातील सर्वात मोठे संस्थान म्हणून परिचित होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात याची विभागणी एकूण १६ जिल्ह्यात झाली. तेलंगणातील तेलुगू भाषिक भागात  वरंगळ, करीमनगर, निजामाबाद, नलगोंडा, महबूबनगर, आदिलाबाद, मेदक आणि हैदराबाद या आठ जिल्ह्यांचा यात समावेश होता. तर कर्नाटकातील गुलबर्गा, रायचूर आणि बिदर हे तीन जिल्हे होते. शिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव आणि नांदेड या पाच जिल्ह्याचा समावेश यात होता. 
संस्थानाचे शेवटचे शासक निजाम मीर उस्मान अली खान हे इस्लामिक असले तरीही संस्थानातील बहुतांश प्रजा ही हिंदू, लिंगायत संप्रदायाला मानणारी होती. ज्यात तेलगू भाषिक ५० टक्के, मराठी भाषिक २५ टक्के १५ टक्के कानडी तर १० टक्के उर्दू भाषिक होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान सन १९११ साली गादीवर आले. संस्थानात दळणवळण, शिक्षण अनेक प्रशासकीय इमारती निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात बांधल्या गेल्या. परंतु संस्थानातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के असलेल्या इस्लामिक लोकांना ९० टक्के प्रमाणात शासकीय नौकऱ्यात सर्वाधिक प्राधान्य दिल्या जात. अपवाद काही हिंदू वगळता सर्व उच्च पदस्थ अधिकारी हे इस्लाम ला मानणारेच असायचे. ज्या मुळे पिढीजात जहागीरदारांचा वर्ग स्वतःस आर्थिक दृष्या असुरक्षित वाटून घेत असत. इस्लामच्या प्रचारासाठी संस्थानाचे पगारी प्रचारक ही पुढे सरसावल्या गेले. ज्या मुळे हिंदूंच्या सांस्कृतिक परंपरांना मर्यादा आल्या. परंतु हे सर्व सातव्या निजामाच्याच कृपेने असे नव्हे. यात साल १९०६ साली स्थापन झालेल्या मुस्लिम लीग चा ही थेट हस्तक्षेप बळावला होता. जो ब्रिटिशांच्या "फोडा आणि राज्य करा" या नीतीचाच एक छुपा अजेंडा होता.  जो अजेंडा जिन्ना द्वारे हैद्राबाद संस्थानात ही वापरला गेला.
तो कसा हे पुढील भागात
.
*क्रमशः*
.
- © *रोहित जगदाळे पाटील*
(लेखक जगदाळे हे हैद्राबाद संस्थानातील १०४ वर्षीय ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी *स्वामी श्रद्धानंद सरस्वती (पूज्य हरिश्चंद्र गुरुजी)* यांचा नातू आहेत.)

Comments

Popular posts from this blog

हिंदुनो आता तरी सावध व्हा.

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा स्वामी विवेकानंद का आग्रह क्यों?*

नव काँग्रेसींनो १० जनपथ ची चाकरी म्हणजे काँग्रेस नाही.