*गांधींची रामराज्य संकल्पना, समाजवादी संरचना आणि त्याची मूलभूत तत्वे*

बऱ्याच दिवसा पासुन यावर विस्तृत लिखाण करावे असे वाटत होते परंतु योग आज जुळून आला. छत्तीसगढ मधील रायपूर येथे आयोजित धर्म संसदे मधे कालीचरण यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेली विवादास्पद टिपणी काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. बऱ्याच वाहिन्यांनी त्याला प्रसिद्धी दिली आणि कालीचरण यांच्यावर कायदेशीर फास आवळला गेला. कालीचरण यांनी केलेली आक्षेपार्ह टिपणी कुठल्याही सभ्य समाजात स्वीकृत केली जाऊ शकत नाही. किंवा त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. भावनेच्या ओघात किंवा अपूर्ण माहिती कारणे कालीचरण यांचे समर्थन करणारा एक मोठा समुह देखील सोशल मीडिया वर दिसून आला. जो धर्माच्या आड कालीचरण यांची पाठराखण करताना दिसून येत होता. परंतु अशी अशोभनीय टीका टिपणी देखील धर्मसंमत नाही. कालीचरण यांनी धर्माचे महात्म्य त्यांच्या भाषेत त्यांच्या अनुयायांना समजाऊन सांगितले आणि आपल्या पाठीमागे हजारो प्रशंसकांचा एक वर्ग तैय्यार केला. परंतु तो वर्ग म्हणजेच धर्म अशी अवधारणा समाज मनात बिंबविण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न जाणीव पूर्वक हणून पाडण्याचे कर्तव्य एक धर्मप्रेमी विचारक म्हणून माझेही आहे. धर्माची खरी व्याख्या या ही अगोदर बऱ्याचदा मी यूट्यूब वरून आणि लिखाना द्वारे मांडलेली आहे. जुन्या काळात ग्रामीण भागात एक वाक्प्रचार प्रचलित होता. जो वाक्प्रचार नियमित जुनी वयोवृद्ध माणसे वापरायची. तो वाक्प्रचार म्हणजे
"अरे जरा धर्माने वाग बाबा" म्हणजेच "चांगल्या वृत्तीने, चांगल्या नियतीने वाग बाबा" इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या पूर्वजांनी धर्माची व्याख्या सांगितली तरी आपण धर्मास एखाद्या व्यक्ती भोवती केंद्रीत करतो याचे मोठे आश्चर्य वाटते. 
             सन १९२० च्या दशकात आणि १९३९ मधे गांधींच्या काही धोरणात्मक चुका अवश्य झाल्या. अली बंधूचे कपट ओळखण्यात अयशस्वी झालेल्या गांधींना सावध करण्याचे प्रयत्न त्या काळात स्वामी श्रद्धानंद, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर आणि डॉ मुंजे यांनी केले होते. परंतु गांधींनी त्या कडे सफशेल दुर्लक्ष केले. परिणामी खिलाफत चळवळीने उग्र स्वरूप धारण केले आणि हजारो हिंदूंना मोपला येथे त्याचे भीषण परिणाम भोगावे लागले. शिवाय १९३९ ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा काँग्रेसचा राजीनामा.अश्या काही धोरणात्मक चुका गांधी यांच्या कडून झालेल्या आहेत. त्या दुर्लक्षित केल्या जाऊ शकत नाहीत. शिवाय स्वामी श्रद्धानंद यांचा हऱ्यारा अब्दुल रशीद यावर गांधी यांची गोलमोल प्रतिक्रिया ही नेहमीच विवादाचा विषय ठरत आलेली आहे. परंतु गांधींनी मांडलेली रामराज्य संकल्पना, समाजवादी संरचना आणि त्याची मूलभूत तत्वे ही भारताच्या आत्मीयतेला अनुसरून होती हे ही तितकेच खरे. गांधी यांच्या अगोदर देखील हा विचार देशात अनेक विचावंतांनी मांडलेला असला तरी देशाच्या आत्मियतेला पोषक हा विचार गांधींनी पुढे रुजवला हे ही तितकेच खरे आहे.     
            देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया हा ग्रामीण भारतात आहे आणि त्या दृष्टीने व्यवस्था आखली गेली पाहिजे असे गांधींनी निक्षून सांगितले. युरोपातील भांडवलशाही संस्कृती द्वारे भौतिक समृद्धीची बीज भारता सारख्या राज्यात अस्तित्वात आली तरी ती तात्पुरत्या स्वरुपात आणि काही मर्यादित क्षेत्रा पुरती स्वीकारली जावी. त्याचे दीर्घकालीन महिमामंडण योग्य नाही असे गांधींना वाटायचे. जोवर देशातील गाव समृद्ध होणार नाहीत तोवर देशात खऱ्या अर्थाने रामराज्य नांदू शकत नाही आणि भारता सारख्या कृषिप्रधान देशाचा विकास गावांच्या सर्वांगीण विकासा शिवाय अशक्य असल्याचे गांधींनी वेळोवेळी सांगितले. म्हणून त्यांनी स्वदेशी चळवळीचे महत्त्व विषद केले. व त्यास बळ देण्याचे काम केले. आजही भारत सरकारच्या ग्रामीण भारताशी निगडित बऱ्याच योजना महात्मा गांधी यांच्या नावे चालतात. 
            सामाजिक संरचने विषयी भाष्य करताना वेदाधारीत वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार गांधींनी केला आणि ही व्यवस्था जन्माने नव्हे तर कर्माने अंगिकारली गेली आहे असेही गांधींनी सांगितले. स्वतंत्र भारताचे संविधान हे कुठल्याही विलायती राज्याच्या संवैधानिक परंपरेला छेद देणारे आणि स्वतःची स्वतंत्र छाप सोडणारे संविधान असले पाहिजे. असेही गांधींचे मत होते. 
         फाळणीचे पाप गांधींच्या माथी फोडण्याचे प्रयत्न काही जण सर्रास करतात परंतु द्विराष्ट्र सिद्धांताचे मुळ जनक कोण ? पुढे त्या सिद्धांताला खतपाणी कुणी घातले ? गांधी यांची फाळणीवर काय भूमिका होती ? जिन्ना - एडविना - नेहरू या तिकडीचा परस्पर काय संबंध होता ? या सर्व इतिहासातील बारकाईचा कुठल्याही प्रकारचे अवलोकन न करता फाळणी साठी गांधींना जिम्मेदार धरायचे हे थोडे अतीच आहे. गांधी जर इतकेच चुकीचे असते जितके गलिच्छ भाष्य कालीचरण यांनी रायपूर येथील आयोजित धर्मसंसदे मधे केले. तर शुद्धी आंदोलन चे प्रणेते आणि गुरुकुल कांगडी चे संस्थापक आर्य समाज आणि काँग्रेस चे मोठे नेते स्वामी श्रद्धानंद यांनी गांधींना महात्मा हे उपनाम प्रदान केले असते का ? नक्कीच केले नसते. सबब... टीका टिपणी किंवा कुठलाही आक्षेप देखील एखाद्या मर्यादे पर्यंत ठीक आहे.. परंतु द्वेषाने देशासाठी योगदान देणाऱ्या कोणत्या ही व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची गरज नक्कीच नाही. 
राजीव जी दीक्षित यांनी देखील हजारो व्याख्याने दिली. भारतीय इतिहासातील सर्व घडामोडी खडा न खडा राजीव भाई दीक्षित यांच्या ठायी अगदी संपूर्ण संदर्भासह होत्या. परंतु गांधीजीवर कधीही त्यांनी टीका केली नाही. या ऊपर ही कुणी उणीवा शोधत स्वतःचे मत व्यक्त केले. तर ते एका विशिष्ट मर्यादे पर्यंत ठीक. अमर्याद भाषाशैली चा वापर राष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या कुठल्याही व्यक्तीत्वा साठी योग्य नाही.
.
- *©रोहित जगदाळे पाटील*
    परभणी, महाराष्ट्र.
📞 ०९९६०९८३९९१

Comments

Popular posts from this blog

हिंदुनो आता तरी सावध व्हा.

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा स्वामी विवेकानंद का आग्रह क्यों?*

नव काँग्रेसींनो १० जनपथ ची चाकरी म्हणजे काँग्रेस नाही.